(१) डॉ.एन.गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात वेल्लूर. या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
(अ) चेन्नई
(ब) वेल्लूर)
(क) हैदराबाद
(ड) मुंबई
उत्तर :- (ब) वेल्लूर)
(२) ‘जयपूर फूट’ चे जनक म्हणून …………याना यांना ओळखले जाते.
(अ) डॉ.एन.गोपीनाथ
(ब) डॉ.प्रमोद सेठी
(क) डॉ.मोहन राव
(ड) यांपैकी नाही
उत्तर :- (ब) डॉ.प्रमोद सेठी
प्रश्न २ रा : पुढीलपैकी चुकीची जोडी व लिहा.
(१) डॉ. एन. गोपीनाथ – ओपन हार्ट शस्त्रक्रिया
(२) रामचंद्र शर्मा – कुशल कारागीर
(३) डॉ. सुभाष मुखोपाध्याय – टेस्ट ट्यूब बेबी
(४) डॉ. मोहन राव – पोलिओ)
उत्तर :- (४) डॉ. मोहन राव – पोलिओ)
अचूक जोडी डॉ. मोहन राव – दान केलेल्या मूत्रपिंडाचे यशस्वी प्रत्यारोपण
प्रश्न ३. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) कुटुंबसंस्था :
उत्तर :- कुटुंब ही एक सामाजिक संस्था असून तो प्रत्येक समाजातील एक मूलभूत समूह आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात कुटुंबसंस्था ही भारतीय समाजाची एक प्रमुख ओळख होती. भारत प्रमुख्याने एकत्र कुटुंब पद्धती’ असणारा देश म्हणून ओळखला जायचा. परंतु जागतिकीकरण, औद्योगिकीकरण यांमुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागल्यामुळे एकत्र कुटुंबपद्धतीचे विघटन होऊ लागले. विभक्त कुटुंबपद्धतीला चालना मिळाली. कुटुंब एकत्र असो वा विभक्त, ही कायमस्वरूपी टिकणारी संस्था आहे.
(२) जयपुर फूट तंत्रज्ञान :
उत्तर :- १९६८ पूर्वी दिव्यांग व्यक्तींना किंवा अपघातात हात-पाय गमावलेल्या व्यक्तींना आपले उर्वरित आयुष्य कष्टाने काढावे लागे. डॉ. प्रमोद सेठी यांनी रामचंद्र शर्मा या कारागिराच्या मदतीने कृत्रिम हात, पाय, नाक, कान तयार केले. या तंत्रज्ञानामुळे कृत्रिम पायांवर बूट घालण्याची गरज नसते. असे अवयव वापरून पाण्यात वा ओल्या स्थितीत काम करता येते. जयपुर फूट तंत्रज्ञान वापरून दिव्यांग व्यक्ती सुदृढ माणसांप्रमाणे काम करतो. त्यामुळे हे तंत्रज्ञान दिव्यांगांसाठी वरदान ठरले आहे.
(३) शहरीकरण :
उत्तर :- शहरांत किंवा नागरी क्षेत्रांत लोकवस्ती केंद्रित होण्याच्या प्रक्रियेस शहरीकरण असे म्हणतात. वाढीव लोकसंख्येमुळे नागरीकरण घडून येते. शहरात होणाऱ्या औद्योगिकीकरणामुळे रोजगार निर्मिती होते. रोजगाराच्या संधींमुळे ग्रामीण भागाकडून शहरात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. वैद्यकीय सोयींमुळेही मृत्यू दरात घट होऊन नागरी वस्तीत वाढ होते. शहरी भागात असणाऱ्या सोई-सुविधांमुळे लोक शहरांकडे आकर्षित होतात; त्यामुळे शहरीकरण मोठ्या प्रमाणात होते.
(४) बदलते आर्थिक जीवन :-
उत्तर :- मध्ययुगापूर्वीपर्यंत गावांचे जीवन आर्थिक दष्ट्या स्वंयपर्ण होते. गावाच्या सर्व गरजा गावातच भागवल्या जात असत. शेतीसंबंधींची कामे करणाऱ्यांना मोबदला म्हणून शेतीच्या उत्पन्नातील काही भाग दिला जात असे. आधुनिक काळात ही परिस्थिती बदलली. वस्तुविनिमय पद्धती जाऊन व्यवहार चलनात होऊ लागले. शेतीशिवाय शेतीशी निगडित जोडधंदे सुरू झाले. खेड्यांचे विद्युतीकरण झाले. सिंचनव्यवस्था व वाहतूक यात सुधारणा झाली. नागरी समाज बिगरशेती उत्पादन व सेवा व्यवसायांशी जोडलेला आहे. औद्योगिकीकरणामुळे ग्रामीण आणि शहरी आर्थिक जीवन पूर्णतः बदलून गेले आहे.
प्रश्न ४. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली.
उत्तर :- १९७८ पूर्वी भारतात दरवर्षी जन्माला आलेल्या दहा मुलांपैकी सहा मुले जन्मल्यानंतर वर्षभरातच अनेक दुर्धर रोगांनी मृत्यू पावत असत. या रोगांत पोलिओ, गोवर, धनुर्वात, क्षय, घटसर्प, डांग्या खोकला यांचा समावेश होता. औषधोपचाराअभावी मृत्यूची संख्या जास्त असे. त्यामुळे या रोगांवर मात करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला व १९९५ मध्ये पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली.
(२) ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आली.
उत्तर :- भारत सरकारच्या पंचवार्षिक योजनांमध्ये ग्रामीण भागाच्या विकासाला महत्त्व दिले होते. ग्रामीण भागांत पिण्याच्या पाण्याची खूपच वानवा होती. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत असे. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर महाराष्ट्र सरकारने ग्रामीण पाणीपुरवठा व लोकांचे आरोग्य या प्रश्नांकडे लक्ष दिले. ग्रामीण भागातील विहिरी खणणे व नळांवाटे लोकांना पाणीपुरवठा करणे या हेतूने शासनाकडून ‘ग्रामीण पाणीपुरवठा योजना’ सुरू करण्यात आली.
प्रश्न ५. पुढील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.
(१) संविधानाप्रमाणे कोणत्या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे ?
उत्तर :- भारतीय समाजात पूर्वी धर्म, जात इत्यादी कारणांवरून भेदभाव पाळले जात असत. कनिष्ठ मानल्या गेलेल्या जातीतील लोकांचे जीवन हलाखीचे होते. त्यांना कोणतेही अधिकार नव्हते. स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताचे संविधान तयार झाले. संविधानाने समानतेचे तत्त्व स्वीकारले आहे. भारतात धर्म, वंश, जात, लिंग, भाषा किंवा जन्मस्थान या कारणांवरून नागरिकांत भेदभाव करण्यास मनाई करण्यात आली.
(२) समाजकल्याण कार्यक्रमाचे कोणते उद्दिष्ट आहे ?
उत्तर :- समाजकल्याण कार्यक्रमाची पुढील उद्दिष्टे आहेत.
१) कल्याणकारी राज्य निर्माण करणे.
२) भारतीय नागरिकांना पूर्ण रोजगार देणे.
३) आरोग्यसुविधा उपलब्ध करून देणे.
४) शिक्षणाची व विकासाची संधी सर्व नागरिकांना उपलब्ध करून देणे.
(३) ग्रामीण विकासासंदर्भात कोणती आव्हाने आहेत ?
उत्तर :- ग्रामीण विकासासंदर्भात आपल्या देशासमोर पुढील आव्हाने आहेत.
१) आर्थिक व्यवसायांचा विकास करणे.
२) सामाजिक गरजा व सुविधांचा विकास करणे.
३) सांस्कृतिक, सामाजिक व वैचारिक दृष्टीकोनात बदल घडवून आणणे.
४) जमीन सुधारणा व जलसिंचन प्रकल्पांस गती देणे.
६. सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्या.
भारतीय जनतेचे राहणीमान वाढवावे व सार्वजनिक आरोग्य सुधारावे यासाठी स्वातंत्र्योत्तर काळापासून अनेक पावले उचलली गेली.
उत्तर :-
१) आरोग्य व समाजकल्याण खात्यामार्फत प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली.
२)ऍलोपॅथी , युनानी, होमिओपॅथी, आयुर्वेद व निसर्गोपचार पद्धतींना मान्यता देऊन लोकांचे आरोग्य चांगले राखण्याचा प्रयत्न केला जात आहे.
३) डॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
४) डॉ. प्रमोद सेठी यांच्या ‘जयपूर फूटच्या’ शोधाने दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव तयार केले जाऊ लागले.
५) डॉ. जॉनी व डॉ. मोहन राव यांनी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.
६) डॉ. सुभाष मुखोपाध्याय यांच्या देखरेखीखाली टेस्ट ट्यूब बेबीचा कृत्रिम गर्भधारणतंत्राचा प्रयोग यशस्वी झाला.
७) पोलिओ, गोवर, धनुर्वात इत्यादी रोगांवर मात करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
८) १९९५ मध्ये ‘पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली.