१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही?
(अ) अमेरिका
(ब) रशिया
(क) जर्मनी
(ड) चीन
उत्तर -क
(२) भारतात बाल-कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था
(अ) युनिसेफ
(ब) युनेस्को
(क) विश्वस्त मंडळ
(ड) रेडक्रॉस
उत्तर - अ
(३) संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या.........
(अ) १९०
(ब) १९३
(क) १९८
(ड) १९९
उत्तर - ब
२. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
(१) आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे.
उत्तर: हे विधान बरोबर आहे; कारण-
(१) जगातील सर्व देश आमसभेचे सभासद असतात. हे सर्व प्रतिनिधी आमसभेच्या अधिवेशनात पर्यावरण,
निःशस्त्रीकरण अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करतात.
(२) निर्णय बहुमताने घेतला जातो.
(३) सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी तसेच महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांवर धोरण
ठरवण्यासाठी आमसभा हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे.
(२) संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो.
उत्तर: हे विधान चूक आहे; कारण
(१) जगातील सर्व सार्वभौम राष्ट्रे संयुक्त राष्ट्रांचे सभासद आहेत, ही राष्ट्रे आमसभेची सभासद असतात.
(२) देश श्रीमंत असो की गरीब, छोटा अर्सो की मोठा, सर्व सभासद राष्ट्रांचे आमसभेतील स्थान व दर्जा
समान असतो.
(३) सभासद राष्ट्राला प्रत्येकी एक मत असते; म्हणून संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान असतो.
(३) चीनने सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा वापर करूनही ठराव संमत होऊ शकतो.
उत्तर: हे विधान चूक आहे; कारण -
(१) चीन हे सुरक्षा परिषदेतील कायम सदस्य राष्ट्र आहे.
(२) सुरक्षा परिषदेतील कायम सदस्य असणाऱ्या पाच राष्ट्रांना नकाराधिकार आहे.
(३) नकाराधिकार असणाऱ्या एका राष्ट्राने जरी हा अधिकार वापरला; तरी तो ठराव मंजूर होऊ शकत नाही;
म्हणून चीनने सुरक्षा परिषदेत या अधिकाराचा वापर केल्यास ठराव संमत होऊ शकणार नाही.
(४) संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
उत्तर: हे विधान बरोबर आहे; कारण -
(१) संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेविषयीच्या ज्या परिषदा झाल्या, त्यात भारत सहभागी होता.
(२) भारताने निर्वसाहतीकरण, निःशस्त्रीकरण, वंशभेद असे विविध प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर
उपस्थित केले.
(३) संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेत भारताने आपले सैन्य पाठवले आहे. अशा रितीने भारताने सुरुवातीपासूनच संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
३. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) नकाराधिकार
उत्तर: (१) एखादया महत्त्वाच्या प्रश्नावर सुरक्षा परिषदेतील स्थायी राष्ट्रांना नकार देण्याच्या अधिकाराला
'नकाराधिकार' असे म्हणतात.
(२) सुरक्षा परिषदेत एखादया प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी पाच कायम सदस्य व किमान चार अस्थायी सदस्य
यांचा होकार असणे आवश्यक असते.
(३) परंतु कायम सदस्यांपैकी एका सदस्याने जरी हा नकाराधिकार वापरून विरोधी मत दिले; तरी तो
निर्णय अमान्य होतो.
(२) युनिसेफ (UNICEF).
उत्तर: (१) आंतरराष्ट्रीय क्षेत्रात बालकांच्या विकासासाठी निधी उभारण्यासाठी 'युनिसेफ' ही संयुक्त राष्ट्रांची
एक संलग्न शाखा १९४६ साली स्थापन करण्यात आली.
(२) लहान मुलांना सकस आहार व आरोग्यसेवा पुरवण्याचे काम युनिसेफ करते.
(३) बाल कुपोषणाच्या समस्येवर कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत युनिसेफ अविकसित देशांत
कार्यशाळाही आयोजित करते.
(४) न्यूयॉर्क येथे युनिसेफचे मुख्य कार्यालय आहे.
४. थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) संयुक्त राष्ट्रे या संघटनेच्या स्थापनेची कारणे लिहा.
उत्तर: (१) दुसऱ्या महायुद्धात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली.
(२) या युद्धात अणुबॉम्बचा वापर झाल्याने ही हानी अधिकच वाढली.
(३) अशा प्रकारची विनाशकारी युद्धे थांबली पाहिजेत, ही सर्व राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी आहे, असा
विचार सर्वच राष्ट्रे करू लागली.
(४) जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघासारखी एक यंत्रणा निर्माण झाली पाहिजे, या
विचारातून दुसरे महायुद्ध संपल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना करण्यात आली.
(२) संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना कोणती भूमिका बजावते?
उत्तर: संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना संघर्षग्रस्त भागात पुढील भूमिका बजावते :
(१) संघर्षग्रस्त भागात हिंसेला प्रतिबंध करून मध्यस्थी करते.
(२) शांतता निर्माण होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करते.
(३) शांतता रक्षणासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करते.
(४) सुरक्षेबरोबरच राजकीय आणि शांतता बांधणीसाठी साहाय्य करते.
(३) संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे लिहा.
उत्तर: संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेची पुढील उद्दिष्टे आहेत :
(१) जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे.
(२) राष्ट्राराष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून आर्थिक सहकार्य वाढवणे.
(३) आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे.
(४) मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे.
५. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
(१) संयुक्त राष्ट्रांच्या घटकशाखांविषयी माहिती देणारा पुढील तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
(२) संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेचा कालक्रम पुढील कालरेषेवर दाखवा.
उत्तर:
(३) संयुक्त राष्ट्रांच्या संदर्भातील पुढील वृक्षतक्ता पूर्ण करा.