१. पुढील विधाने चूक की बरोबर ते ओळखून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा.
(१) संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासनाची
जबाबदारी असते.
उत्तर: विधान बरोबर आहे.
(२) केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) महाराष्ट्रातील सनदी सेवांसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे उमेदवार
निवडतो.
उत्तर: विधान चूक आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अखिल भारतीय सेवा व केंद्रीय सेवांसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे उमेदवार
निवडतो.
२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) सनदी सेवांमध्येही राखीव जागांचे धोरण आहे.
उत्तरः (१) समाजामध्ये महिला, दिव्यांग लोक यांसारख्या दुर्बल घटकांबरोबरच पूर्वापार चालत आलेला
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती हा मोठा दुर्बल घटक आहे.
(२) या वर्गांना इतर वर्गांच्या बरोबर आणणे आवश्यक होते.
(३) सामाजिक विषमतेमुळे हे दुर्बल घटक नोकऱ्यांप्रमाणेच सनदी सेवेलाही वंचित राहिलेले होते.
(४) नोकरशाही व सनदी सेवा यांत दुर्बल घटकांना संधी देऊन सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी
राखीव जागांचे धोरण स्वीकारण्यात आले.
(२) सनदी सेवकांनी राजकीयदृष्ट्या तटस्थ असणे गरजेचे आहे.
उत्तर : (१) भारतीय लोकशाही प्रणालीत दर पाच वर्षांनी नवे सरकार अधिकारावर येते; परंतु नोकरशाही
कायम असते.
(२) आधीच्या सरकारांनी स्वीकारलेल्या धोरणांची, निर्णयांची अंमलबजावणी नोकरशाहीने तितक्यात
कार्यक्षमतेने व निष्ठेने करणे अपेक्षित असते.
(३) सनदी सेवकांनी कोणतीही राजकीय भूमिका न घेता निर्णयांची अंमलबजावणी करायची असते; कारण
सरकार बदलले तरी धोरणात बदल होत नाही; तोपर्यंत ती चालूच राहतात.
(४) सनदी सेवकांनी राजकीयदृष्ट्या प्रेरित होऊन काम केल्यास कामकाजात अनागोंदी निर्माण होईल;
म्हणून सनदी सेवकांनी राजकीयदृष्ट्या तटस्थ असणे गरजेचे असते.
३. खालील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.
(१) खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालण्यामागील मंत्री व सनदी सेवकांची भूमिका स्पष्ट करा.
उत्तर: कोणत्याही खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालण्यासाठी मंत्री आणि सनदी सेवक यांचे संबंध
परस्पर पूरक असले पाहिजेत.
(१) सनदी सेवकांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारेच मंत्री निर्णय घेत असतात.
(२) अनेकदा मंत्र्यांना आपल्या खात्यातील अनेक बाबी माहीतही नसतात. ते सनदी सेवकांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारे निर्णय घेत असतात.
(३) एखादया योजनेचा तपशील, त्यासाठी उपलब्ध असणारा आर्थिक निधी, योजनेचा इतिहास यासंबंधीची
पूर्ण माहिती सनदी सेवकांनाच माहीत असते.
(४) मंत्र्यांनीही सनदी सेवकांवर पूर्ण विश्वास टाकून त्यांच्याकडून काम करवून घेतले पाहिजे. त्यांचा योग्य
आदर राखून पारदर्शक कारभार केल्यास खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालू शकेल.
(२) नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य कसे लाभते हे स्पष्ट करा.
उत्तर:
(१) मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे काम नोकरशाही करीत असते.
(२) स्वातंत्र्योत्तर काळापासून प्रशासकीय निर्णयांच्या अंमलबजावणीचे काम नोकरशाहीने प्रभावीपणे
केल्यामुळेच त्याचे समाजावर चांगले परिणाम घडून आलेले दिसतात.
(३) सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा, शेती सुधारणा इत्यादी सेवा जनतेला अखंडितपणे मिळण्यात
नोकरशाहीचेच परिश्रम उपयुक्त ठरत आहेत.
(४) सामाजिक बदल, समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे इत्यादी बाबीही
नोकरशाहीमुळेच शक्य झाल्या आहेत. अशा रितीने नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य मिळाले आहे.
४. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
५. नोकरशाहीचे स्वरूप स्पष्ट करा.
उत्तर:
भारतीय नोकरशाहीची रचना व स्वरूप अतिशय व्यापक व गुंतागुंतीचे आहे.
(१) शासनाची धोरणे, प्रत्यक्ष कार्यवाहीत आणणारी प्रशासकीय यंत्रणा म्हणजे 'नोकरशाही' होय.
(२) मंत्रिमंडळ बदलले तरीही नोकरशाहीचे अस्तित्व कायमस्वरूपी असते.
(३) राजकीयदृष्ट्या ती तटस्थ राहून आपली जबाबदारी पार पाडत असते.
(४) खात्याच्या अकार्यक्षमतेबाबत थेट नोकरशाहीला जबाबदार न धरता, त्या खात्याच्या मंत्र्याला जबाबदार
धरले जाते व नोकरशाहीला अनामिक ठेवले जाते.